|

थंडीमध्ये कानात सतत कापसाचे बोळे कशाला?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ऋतुचक्र पाहता दिवाळीपासून होळीपर्यंत हिवाळा ऋतू अर्थात थंडीचे दिवस असतात. या काळात थंडीपासून शरीराचं संरक्षण करण्यासाठी आपण कितीतरी गोष्टी करतो. लोकरीचे स्वेटर, कानटोपी, माकडटोपी, मफलर, लोकरीचे हातमोजे, पायमोजे आणि कानात कापूस. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत सकाळच्या सूर्य किरणांची एक झलक देखील हवीहवीशी वाटते. प्रामुख्याने ग्रामीण भागात उंच डोंगर, दाट झाडी, शेती आणि पाण्याचे भाग अधिक असल्यामुळे या भागांमध्ये थंडी जास्त जाणवते. मग कधीतरी सुट्टीसाठी गावी जाणारे लोक कानात कापसाचे बोळे घालून फिरतात. याचे कारण असे कि, ‘कापसाचे बोळे घातल्यामुळे कानात गार वारा जात नाही आणि थंडी बाधत नाही,’ असा अनेकांचा पक्का गैर_समज असतो. होय. मित्रांनो हा समज अत्यंत चुकीचा आहे. आता हे असे का ते समजून घ्यायचे असेल तर हा लेख पूर्ण वाचा आणि जाणून घ्या.

० वातावरणातल्या थंडीमुळे आपलं शरीर थंड होते. अर्थात आपल्या शरीराचे बाह्य तापमान कमी होते मात्र अंतर्भागाचं तापमान संतुलित असतं. मर्यादित स्वरूपातल्या थंडीपासून बचाव करण्यासाठी आपल्याला हुडहुडी भरून येते आणि बाह्य त्वचेमधील रक्तवाहिन्या आकुंचित पावून शरीरातील उष्णता कायम ठेवली जाते. दरम्यान, लोकर ही उष्णतेची मंदवाहक असल्यामुळे लोकरीचे विविध कपडे शरीरातील उष्णता बाहेर पडून देत नाहीत आणि आपलं शरीर उबदार राहतं. परंतु कानात कापूस घातल्यामुळे थंडीपासून बचाव होतोच असे नाही. कारण..,

१) कानाचा शरीरातल्या आतील भागाशी थेट संपर्क नसतो. बाह्यकर्णापासून इंचभर लांब श्रवणमार्ग आत जातो आणि त्याच्या अखेरीस कानाचा पडदा असतो. कानाचा घशाशी आणि श्वसन मार्गाशी संपर्क आणणारी एक नलिका असते. या नलिकेला युस्टेशियन ट्यूब असे म्हणतात. हि नलिका कानाच्या पडद्या पलीकडे असते. त्यामुळे वातावरणातील थंड हवा आत जाऊन सर्दी होते, हा समज चुकीचा ठरतो.

२) बाह्यकर्ण आणि कानाच्या पाळ्या या लवचिक हाडाने बनलेल्या असतात. नाकाच्या रचनेतही अशीच लवचिक हाडे असतात. यामध्ये रक्तप्रवाह थोडा कमी असतो. परिणामी थंडीमुळे ते लगेच गार पडतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये हा गैरसमज रुजला आहे. थंडीमध्ये कानात बोळे घालण्याऐवजी कान मफलरनं किंवा स्कार्फनं झाकून घेणं हे थंडीपासून बचाव करण्यासाठी जास्त हितावह आहे. हे समजून घ्या. कानात कापसाचा बोला घालून ठेवल्याने अनेक अपाय होण्याची शक्यता असते. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) कानात साचलेल्या मळामध्ये कापसाचे तंतू चिकटून बसतात. यामुळे सतत कापसाचा बोळा घातल्यास कानाला आतून जंतूसंसर्ग होतो आणि आरोग्यावर याचा परिणाम होतो.

२) तसेच काही व्यक्तींचा कान दुखावलेला असल्यास त्यातून सतत पाणी येत असतं. या स्थितीला सामान्य भाषेत कान फुटणे असे म्हणतात. अशावेळी कापसाचे हे तंतू निश्चितच कानाचं आरोग्य जास्त खराब करतात.

३) कान फुटल्यावर वा कानात जखम झाली असल्यास त्यातून येणारा द्राव रोखण्यासाठी कानात कापूस घालून ठेवू नये. यामुळे कानाचे आरोग्य आणखी खराब होण्याची शक्यता असते.

४) कानातील कापसामुळे बाहेरून येणाऱ्या ध्वनीलहरी शोषल्या जातात. साहजिकच ध्वनी ग्रहण करण्याची शक्ती कमी होते. अर्थात कमी ऐकू येते.

० टीप – पोहताना पाणी कानात जाऊन बाह्यकर्णात जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून किंवा विमानप्रवास करताना उंचावरील कमी झालेल्या हवेच्या दाबानं कानाच्या पडद्याला इजा होऊ नये म्हणून कापसाचे बोळे कानात घालण्याऐवजी कानाचं संरक्षण करणारे, चांगल्या पद्धतीचे इअरप्लग्ज वापरा.