|

गर्भारपणात सुरुवातीच्या काळातच पोटात कळा का येतात?; जाणून घ्या कारणे आणि खास टिप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एका स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा काळ म्हणजे गर्भारपण. या गर्भारपणात पोटात एक जीव आकार घेत असतो पण याचसोबत एका स्त्रीमध्ये आई जन्म घेत असते. या दरम्यान न जाणे कित्येक समस्या स्त्रीसमोर उभ्या राहतात. अगदी वजन वाढण्यापासून ते प्रसूतीच्या काळांपर्यंत. या काळात पोटात कळा येणे ही अगदीच सामान्य बाब आहे. त्यामुळे ही काही मोठी समस्या नाही. परंतु जर या कळा तीव्र असतील, तर स्त्रीरोग तज्ज्ञाकडून त्याचे मूल्यमापन करणे अत्यंत गरजेचे आहे. याचे मुख्य कारण असे कि गर्भधारणे दरम्यान आपल्या आई आणि मूल असे दोन जीव एकमेकांत गुंतलेले असतात. त्यामुळे दोघांच्याही आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

गर्भारपणाच्या सुरुवातीच्या दिवसांत पोटात कळा येणे हि बाब सामान्य आहे का? असे अनेक प्रश्न स्त्रियांना भेडसावत असतात. या प्रश्नांचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ सांगतात कि, गर्भाशयात ९ महिने बाळ वाढीदरम्यान गर्भवती महिलेच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे याची नक्की कारणे काय हे प्रत्येक स्त्रीला माहीत असणे गरजेचे आहे. परंतु याबाबत कोणतीही अर्धीमुर्धी माहिती जमा करू नये. कारण अज्ञानापेक्षा अर्ध ज्ञान अधिक घातक असते. चला तर जाणून घेऊयात गर्भधारणेदरम्यान पोटात कळा येण्यामागे नेमकी कारणे कोणती?

० गर्भधारणेच्या सुरुवातीच्या तिमाहीत पोटात कळा येणे म्हणजे नक्की काय?
– गर्भधारणेच्या सुरुवातीच्या तिमाहीत पोटात कळ येणे ओटीपोटात दुखणे, स्नायुंवर ताण येणे अश्या समस्या उदभवतात. यात काही वेळेस मासिक पाळीसारखेदेखील वाटते. जेव्हा शरीराची हालचाल होते, शिंकणे. खोकणे यामुळे पोटात वेदना जाणवतात. दरम्यान या वेदना सौम्य असतात. परंतु, जर पोटात तीव्र कळ येत असेल, तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे अयोग्य आहे. याकरिता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

० गर्भारपणात पोटात कळा येण्यामागील सर्वसाधारण कारणे खालीलप्रमाणे-

१) गर्भधारणेनंतर १ ते २ आठवडे पोटात कळा येतात. कारण, एखाद्याच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये अंडी फलित झाल्यानंतर, ते गर्भाशयात प्रवेश करते आणि यामुळे गर्भाशयात बदल होतात. परिणामी सुरुवातीच्या काळात थोडे क्रॅम्प येतात. .

२) गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीत गर्भाची वाढ होताना गर्भाशयावर अतिशय ताण येतो. यामुळे पोटात कळा येतात.

३) गर्भवती स्तृयांचे शरीर खूप लवकर डिहायड्रेट होते. त्यामुळे डिहायड्रेशनमुळे पोटात क्रॅम्प येतात.

४) या दरम्यान ओटीपोटात दुखणे हे देखील क्रॅम्पचे कारण असू शकते. यामागे पोटात गॅस जमा होणे, आतड्यांना सूज येणे, बद्धकोष्ठता आणि पचन समस्यांमुळेदेखील पोटात कळा येतात.

० गर्भारपणात पोटात कळा येण्यामागील गंभीर कारणे खालीलप्रमाणे-

५) जेव्हा अंडी फॅलोपियन ट्यूबमध्ये किंवा इतर कुठेतरी प्रत्यारोपित होतात तेव्हा एक्टोपिक गर्भधारणा होते. अशावेळी पोटात तीव्र कळा येतात.

६) गर्भपात झाल्यामुळे देखील पोटात कळा जातात. शिवाय गर्भपात झाल्यास पोटात कळ येण्यासोबत तीव्र रक्तस्राव देखील होतो. परिणामी स्त्रीचे शरीर कमकुवत होते.

७) मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय)देखील पोटात कळ येण्याचे मुख्य कारण ठरू शकते.

० महत्त्वाच्या खास टिप्स:
– आपल्या बसण्याची आणि झोपण्याची स्थिती बदलण्याचा पुरेपूर प्रयत्न करा.
– थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने अंघोळ करा.
– शरीराला पुरेशी विश्रांती द्या.
– दररोज व्यायाम करायला विसरू नका.
– दुखत्या भागावर गरम पाण्यात बुडवलेला टॉवेल किंवा गरम पाण्याची पिशवी ठेवून शेक द्या.
– शरीरी हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे द्रव्य पदार्थ घ्या. यासोबत अधिक द्रव्यशील फळेही खा.

अत्यंत महत्वाचे – जर तुम्ही गरोदर असाल, तर याबाबतचे अधिक प्रश्न तुमच्या खाजगी डॉक्टरांना विचारा आणि शंकानिरसन करून घ्या. शिवाय कोणताही त्रास जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच औषधे घ्या.