| |

मासिकपाळीचे चक्र का बिघडते?; जाणून घ्या कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल अनेक मुली, स्त्रिया दगदगीच्या जीवनशैलीमुळे स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे लक्ष देण्यास समर्थ नसतात. यामुळे त्यांच्या शारीरिक बदलांच्या गरजेची पूर्तता होत नाही. परिणामी त्यांचे शरीर आतून कमकुवत होऊ लागते. याचा परिणाम मासिक पाळीच्या चक्रावर होत असतो. आजकाल अनेक स्त्रिया त्यांची मासिक पाळी वेळेवर येत नाही, अशी वारंवार तक्रार करतात. काही स्त्रियांची अशीही तक्रार असते कि आम्ही गर्भधारणेची योजना केली नसून सुद्धा मासिक पाळी वेळेवर येत नाही. यामागे नेमके कारण काय? तुम्हीही याच प्रश्नाचे उत्तर शोधताय का? तर मग हा लेख पूर्ण वाचा आणि उत्तर जाणून घ्या.

१) दैनंदिन जीवनशैलीत बदल – दररोजचे नियोजित वेळापत्रक अचानक बदल केल्यामुळे मासिक पाळीचे चक्र बदलू शकते. दरम्यान जर तुम्ही बदलले वेळापत्रक पुन्हा पूर्ववत केलात तर मासिक पाळी नियमित होऊ शकते. परंतु असे न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

२) तणाव – तणावाचा आणि मासिक पाळीचा काय संबंध असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर मैत्रिणींनो, तणावाचा आणि शरीराचा संबंध आहे हे तर तुम्ही मानता ना? याच तणावामुळे जीएनआरएच नावाच्या हार्मोन्सची मात्रा कमी होते, ज्यामुळे मासिक पाळी येत नाही. नियमित मासिक पाळी परत आणण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

३) अशक्तपणा – शारीरिक अशक्तपणादेखील मासिक पाळी अनियमित होण्याचे कारण आहे. कारण शारीरिक अशक्तपणा येण्याची विविध करणे असू शकतात. जसे कि, शरीरात रक्ताची कमतरता.

४) आजार – ताप, सर्दी, खोकला वा कोणत्याही दीर्घ आजारामुळे मासिक पाळी उशिरा येते. हे तात्पुरते कारण असून आपण आजारातून बरे झाल्यावर आपली मासिक पाळी पुन्हा नियमित होते.

५) थायरॉईड – गळ्यातील थायरॉईड ग्रंथी मेटाबॉलिज्म नियंत्रित करतात. शरीराच्या बर्‍याच फंक्शन्समध्ये याची महत्वाची भूमिका असते. आपल्याला थायरॉईड संबंधित कोणतीही समस्या असल्यास या ग्रंथी मासिक पाळी प्रभावित करतात. यामुळे आपल्याला थायरॉईडची समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

६) स्तनपान – स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना वेळेवर मासिक पाळी सुरू होत नाही. मात्र हि काही गंभीर बाब आहे असे म्हणता येत नाही.

७) जन्म नियंत्रण गोळ्या – जन्म नियंत्रण गोळ्या आणि काही इतर औषधे देखील मासिक पाळीची चक्र बिघडवतात. अशी औषधे घेतल्यावर एकतर मासिक पाळी उशिरा येते किंवा मग ती लवकर येते. आणखी सांगायचं म्हणजे कधी कधी मासिक पाली आल्यानंतर रक्तस्राव थांबत नाही. असे झाल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. अन्यथा शारीरिक अस्वस्थता आणि कमकुवतपणा जाणवतो.

८) लठ्ठपणा – लठ्ठपणा मासिक पाळी अनियमित येण्याचे मुख्य कारण असू शकते. साधारणपणे ही समस्या कमी वजनाच्या स्त्रियांनाही होते. पण लठ्ठपणा या स्थितीचे मुख्य कारण आहे.

९) पूर्व रजोनिवृत्ती – स्त्रियांच्या जीवनातील मासिकपाळी बंद होण्याचा काळ हा हळूहळू स्थिरावत जातो. यास पूर्व रजोनिवृत्ती म्हणतात. हा काळ जसा जवळ येतो तशी मासिक पाळी अनियमित होते.