| | |

आजारपूर्व वैद्यकीय तपासणी का आहे गरजेची? ‘हे’ आहेत तपासणीमुळे आयुष्य वाढवणारे फायदे 

हॅलो आरोग्य ऑनलाईन । जिकडे बघावे तिकडे फक्त आणि फक्त मरणाच्या बातम्या!!! दुसऱ्या महायुद्धानंतर आयुष्याबद्दलची नकारात्मकता यापूर्वी कधीच अनुभवली नसेल तेवढी या वर्षभरात अनुभवली आहे. सगळीकडे मरण मरण आणि फक्त मरणचं. जवळपास प्रत्येकाचा, एखादा जवळचा मित्र किंवा नातेवाईक या कोरोनाने आपल्यातून हिरावून घेतला आहे. मनाला आनंद मिळावा असे वातावरण कुठेच दिसत नाही. सगळीकडे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. कुठे ऑक्सिजन कमी पडल्याने, कुठे इंजेक्शन कमी पडल्याने, तर काही ठिकाणी वैद्यकीय सेवांच्या कमतरते मृत्यूचा आकडा वाढू लागला आहे. आपल्या देशाची लोकसंख्या आणि विशालता यामुळे यातून बाहेर पडण्यास वेळ लागणार हे नक्की. काही चांगल्या गोष्टी पण घडत आहेत.  सरकारसहित सर्वच मोठ्या उद्योगपती आणि संस्थांनी देशाची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी कंबर कसली आहे. आणि आपण नेहमीप्रमाणे यातून बाहेर पडणार यात काहीच शंका नाही. कारण परिस्थितीशी टक्कर देणे आणि त्यावर मात करणे हे आपल्या भारतीयांच्या डीन्ए अगदी खोलवर मुरले आहे.

सध्याच्या धकाधकीच्या परिस्थिती मध्ये आपणांसर्वांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतंय असे आपणास वाटत नाही का?  एकतर बाहेरचे फास्टफूड खाणे, आहारात रिफाईंड तेलाचा अतिरिक्त वापर, नियमित व्यायामाचा अभाव यामुळे जवळपास सर्वांची जीवनशैली अनियंत्रित होऊ लागली आहे. त्याचबरोबर वातावरणीय बदलामुळे होऊ घातलेले नवीन जनुकीय आजार, वायू,ध्वनी,पाणी प्रदूषणामुळे होणारे आजार हे हळूहळू मानवी शरीर पोखरून काढू लागले आहेत. ‘मधुमेह, हृद्रोग, कर्करोग नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रम’ २०१० मध्ये चालू करण्याची वेळ शासनावर आली.

मधुमेहाचे कमीतकमी तब्बल आठ कोटी, उच्च रक्तदाबाचे साधारण १५ ते २० कोटी रुग्ण आहेत. आणि हो, ही संख्या जरा फसवीच आहे. कारण हजारो लाखो लोकांना, त्यांना असे काही आजार आहेत आणि त्यानुसार उलथापालथ शरीरात चालू आहे याचा पत्ताच नाही. खरे तर, असे आजाराचे अज्ञान हेच सर्वाधिक काळजीचे कारण आहे. आज कोविडमुळे एसिम्प्टोमॅटिक (लक्षण नसलेला) हा शब्द सर्वाना परिचित झाला आहे, त्याचा आपण धसकाही घेतला आहे. तर या मधुमेह, बीपीसारख्या आजारातही बऱ्याच काळापर्यंत काही रुग्णांमध्ये फारशी नेमकी लक्षणे दिसतातच असे नाही. काहींमध्ये दिसतात, काहींमध्ये नाही. त्यातही समजा लक्षणे दिसली, तरी आपल्याकडे दुर्लक्ष, चालढकल करणे ही सर्वसाधारण सवयच. तर हे आजार ‘सायलेंट किलर’सारखे, चोर पावलांनी येणारे असल्याने आणि आपल्या निष्काळजी वृत्तीमुळे साधारण २५ टक्के ते ५० टक्के लोक हे अनडिटेक्टेड, म्हणजे रोगनिदान न झालेले, आजाराचे लेबल न लागलेले असतात.

तरुणवर्गातही १० पैकी कमीतकमी एक जण हा रक्तदाबाचा रुग्ण असतो. वयाच्या विशी-तिशीतच हे आजार मागे लागत आहेत. आपल्याकडे स्वत:हून वार्षिक वैद्यकीय तपासणी वगैरे करण्याची पद्धत फारशी नाही त्यामुळे ‘आजारपूर्व’ स्थितीत किंवा आजाराच्या सुरुवातीच्या स्थितीत (अर्ली फेज) निदान होत नाही. त्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक, स्ट्रोक, किडनी फेल्युअर अशा इमर्जन्सी आपण ओढवून घेतो. आपले जीवन कायमस्वरूपी व्यापणाऱ्या या ‘जीवनशैलीजन्य आजारां’चे (लाइफस्टाइल डिसीझ) निदान करणे काही कठीण नाही. मधुमेह, बीपी अशा आजारांचे निदान करण्यासाठी तर किती साध्या सोप्या टेस्ट आहेत. आणि हे सर्व आजार आपल्याला अवधी, सुधारायला संधी देतात. तुम्हाला माहीत असेल की १४०/९० च्या वर बीपी सातत्याने राहात असेल तर बीपीचा रुग्ण म्हणून औषधपाणी चालू होते. पण बीपी १३०/८० आणि १४०/९० च्या अधेमधे असेल तर ती आजाराची पूर्वस्थिती.. म्हणजे तेव्हाही आपण आपल्या जीवनशैलीत सुधारणा केली तर आपण ‘रुग्ण’ होणे टाळू शकतो! हीच बाब मधुमेह पूर्वस्थिती असेल तर लागू होते.आपण कोविडच्या महासाथीविषयी आज बोलतो आहोत, ती आज ना उद्या कमी होईल, पण हे जुनाट आजार तर आपल्या पाचवीलाच पुजले आहेत. तिकडे नव्याने लक्ष देणे जरुरीचे आहे. आजारांची ‘फॅमिली हिस्टरी’ असेल तर अधिकच सतर्क राहायला हवे.

सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला आजार अंगावर काढायची सवय असते. ज्यावेळी होईल त्यावेळी कळेलच की, त्याच टेंशन आतापासून का घ्या. म्हणून बरेच लोक गांभीर्याने याकडे पाहत नाहीत. आणि त्यामुळे एखादा आजार जर शेवटच्या टप्प्यात आल्यावर मग धावाधाव केली जाते. याचे उदाहरण सांगायचे झाल्यास जागतिक आरोग्य संघटनेने सन २०२० प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे कि भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर चे प्रमाण हे १४ % आणि पुरुषामध्ये प्रोटेस्ट ग्रंथीच्या कॅन्सर चे प्रमाण हे १३% एवढे चिंताजनक आहे. शरीराच्या कोणत्याही भागाला कॅन्सर होऊ शकतो त्याची आकडेवारी पण भयानक पातळीपर्यंत येऊन ठेपली आहे. सद्यस्थितीला कॅन्सर ची हॉस्पिटल ओसंडून वाहत आहेत आणि त्यावरील खर्चाचे प्रमाण हे सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्याच्या बाहेर आहे, हा फक्त कॅन्सर संदर्भातील आजारासंबधित एक भाग सांगितला त्याचप्रमाणे मधुमेह, हृदयविकार यामुळे मृत्यूचा आकडा हा दरवर्षी अपघातात मरण पावणाऱ्या लोकांच्या कित्येक पट अधिक आहे.

हे टाळण्यासाठी सर्वात जालीम उपाय म्हणजे आजारपूर्व वैद्यकीय तपासणी (PREVENTIVE MEDICAL HEALTH CHECK-UP).  कोणताही रोग हा अचानक कधीच उद्भवत नाही,  मद्यपान, धूम्रपान, लठ्ठपणा, उच्च रक्तातील साखरेची पातळी, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, व्यायामाचा अभाव आणि खराब पोषण यामुळे होणाऱ्या आजाराची सुरवात शरीरात कित्येक महिने, वर्षापासून होत असते. जर आपण वेळेतच या तपासण्या करून घेतल्या, तर त्या आजाराच्या प्राथमिक अवस्थेतच रोग माहिती झाल्यामुळे त्यावर योग्य त्याठिकाणी आणि वेळेवर ऑपरेशन किंवा औषधोपचार करून त्या रोगाचे प्रमाण कमी करता येईल किंवा त्याचे समूळ उच्चाटन करता येणे शक्य आहे. आणि त्यासाठी आजार झाल्यानंतर होणाऱ्या खर्चापेक्षा कित्येक कमी पटीने खर्च होतो आपल्या वयानुसार ६००० ते २५००० रुपयापर्यंत पूर्व वैद्यकीय तपासण्या उपलब्ध आहेत पण त्यासाठी गरज आहे फक्त मानसिकता बदलण्याची आणि वेळेवर तपासण्या करून घेण्याची यांचा समावेश आहे.