| |

ओमिक्रॉन’विषयी WHO’कडून लोकांना दिलासा देणारा मोठा खुलासा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या जगभरात एकच चर्चा आहे ती म्हणजे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची. अर्थातच ओमिक्रॉन व्हेरिएंटची. यामुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं असताना आता जागतिक आरोग्य संघटनेने लोकांना दिलासा देणारा मोठा खुलासा केला आहे. खरंतर अगदी काहीच दिवसांपूर्वी ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सर्वत्र भीतीचे सावट निर्माण झाले होते. शिवाय यावर अद्याप लस नाही म्हटल्यावर अनेकांनी हातपाय गाळले होते. यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण देत पूर्णविराम लावला आहे. WHO’ने रिसर्च केल्यानंतर असे स्पष्ट केले आहे कि, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा जास्त घातक नाही.

अचानक ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका पाहून सुरु असलेल्या लसीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. याशिवाय येणाऱ्या काळात भारतात बूस्टर डोसची गरज भासणार का? असा मोठा सवाल उपस्थित झाल्यामुळे WHO’ने संबंधित रिसर्च रिपोर्ट जाहीर केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने मंगळवारी AFP वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले कि, ओमिक्रॉन हा आधीच्या प्रकारांपेक्षा अधिक गंभीर आहे किंवा विद्यमान लस त्याविरूद्ध प्रभावी ठरणार नाही, असं मानण्याचं कोणतंही कारण नाही.

तर रिसर्च रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे, ओमिक्रॉन, संसर्गजन्य असला तरीही डेल्टासारख्या पूर्वीच्या कोणत्याही प्रकारांपेक्षा तो जास्त गंभीर नाही. याबाबत कोणतेही संकेत अद्याप मिळालेलेच नाहीत. त्यामुळे उपलब्ध लसींच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं संरक्षण निश्चितच होऊ शकतं. शिवाय WHO च्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, ‘आमच्याकडे अत्यंत प्रभावी लस आहेत. ज्या आतापर्यंत आलेल्या सर्व कोरोनाच्या व्हेरिएंटविरोधात उपयुक्त ठरल्या. यामुळे अन्य गंभीर आजार आणि हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही. यामुळे आधीसारखी परिस्थिती उद्भवणार नाही हे नक्की. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. मात्र, ओमिक्रॉनवरील अधिक अभ्यास सुरु आहे. यामुळे हा व्हेरिएंट किती धोकादायक आहे, हे योग्यरित्या जगासमोर मांडण्यासाठी काही काळ अपेक्षित आहे. परंतु तूर्तास तरी ओमिक्रॉन हा मागील डेल्टा स्ट्रेनपेक्षा घातक नाही.