| | |

मासिक पाळीच्या वेदनांपासून ‘हि’ योगासनं देतील आराम; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। योगाभ्यास हि अशी विद्या आहे जिच्या आत्मसाद करण्याने आपले शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यास मदत होते. या विद्येचे महत्व प्राचीन काळापासून फार मोठे आहे. अनेक ऋषी मुनींनी योगाभ्यासाचे धडे देणारे योगग्रंथ देखील लिहिलेले आहेत. तसे पाहता नानाप्रकारची योगासने आहेत जी विविध आजारांवर मात करण्यास मदत करतात. स्त्रियांमध्ये मासिक पाळीदरम्यान वेदनांची समस्या फार मोठी आहे. तर या आसनांमध्ये अशी काही आसने आहेत जी या वेदनेपासून त्वरित आराम देण्यास फलदायी आहेत. तर चला जाणून घेऊ या.

१) बद्ध कोनासन किंवा बटरफ्लाय आसन – या आसनाला बद्ध कोनासन किंवा बटरफ्लाय अर्थात फुलपाखरू आसन म्हणतात. हे करताना आपल्याला पाय समोरच्या बाजूने पसरवून बसा व आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून पाय गुडघ्यापासून दुमडून ओटीपोटाजवळ आणून दोन्ही हाताने घट्ट धरा. नंतर टाचा जननेंद्रियांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा.

दरम्यान लांब आणि दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत गुडघे आणि मांडीवर दाब टाका. ज्या प्रकारे फुलपाखरू पंख हलवते त्याच प्रकारे आपल्याला आपले पाय वरखाली करायचे आहे. या दरम्यान पायाला वेगाने हलवा आणि श्वास घ्या. नंतर श्वास सोडा. सुरुवातीस हळू-हळू करा. मात्र सराव झाल्यानंतर वेग वाढवा.

२) मार्जरी आसन किंवा कॅट आसन – या आसनात आपल्याला एखाद्या मांजरीसारखे बसायचे आहे. हे असं करतेवेळी आपल्याला पुढे वाकायचे आणि मागे वळायचे आहे. असे केल्याने पाठीच्या कण्याला ताण येतो.

यामूळे पाठ दुखी, कंबर दुखी आणि मानदुखीच्या समस्यांमध्ये आराम मिळतो. यामुळे स्त्रियांच्या मासिक पाळीत हे आसन फायदेशीर मानले जाते.

३) उष्ट्रासन किंवा कॅमल आसन – या आसनामध्ये आपल्याला उंटासारखे बसायचे आहे. याकरिता गुडघ्याच्या मदतीने चटईवर बसा आणि दोन्ही हात बैठकीवर ठेवा. दरम्यान गुडघे आणि खांदे समांतर ठेवावे आणि तळपाय आकाशाकडे असावे.

यावेळी श्वास घेताना पाठीचा कणा ताणून घ्या आणि मानेवर कोणताही दाब न देता तसेच बसून राहा. या स्थितीत श्वास घ्या आणि श्वास सोडत पुन्हा पूर्वस्थितीत या आणि हाताला कंबरेवर ठेवत सरळ व्हा.

४) वज्रासन – हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम आपले पाय जमिनीवर पसरवून बसा आणि हात बाजूला ठेवा. पुढे उजव्या आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला दुमडून बैठकीखाली घ्या. टाचा अशाप्रकारे ठेवा की पायाचे बोट एकमेकांवर नसावे.

आता दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा आणि पाठीचा कणा ताठ ठेवून आपले डोळे मिटा. या अवस्थेत किमान ५ ते १५ मिनिटे बसा. सरावानंतर या वेळेत हळू हळू वाढ करा.