ऍसिडिटीच्या त्रासावर योगासनं देतील आराम; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी आपली जीवनशैली सुधारित असणे गरजेचे आहे. खाण्या- पिण्याच्या चुकीच्या सवयीमूळे ऍसिडिटीचा त्रास होणे अगदी सामान्य समस्या असली तरीही त्रासदायक आहे. ऍसिड रिफ्लेक्स म्हणून ओळखली जाणारी ही ऍसिडिटी पोटात जास्त ऍसिड तयार झाल्यामुळे होते. हे जास्त झालेले ऍसिड घशाशी येते. परिणामी चिडचिड, जळजळ, पोटदुखी अशी लक्षणं जाणवतात. खाण्याच्या चुकीच्या सवयीबरोबरच अन्न नीट चावून न खाल्यामुळे आणि पुरेसे पाणी न प्यायल्यामुळे तसेच धुम्रपानामुळे ही ॲसीडिटी उद्भवते. या त्रासावर अनेक औषधं बाजारात उपलब्ध आहेत. परंतु यांसोबत काही योगासनं करणे ऍसिडिटी त्रास टाळण्यासाठी सहाय्यक आहेत. आता हि योगासने कोणती ते जाणून घ्यायचे असेल तर हा लेख पूर्ण वाचा. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) कपालभाती प्राणायाम – हे योगासन करण्यासाठी,
– योगा मॅटवर पाठीचा कणा ताठ ठेवून बसा.
– यानंतर डोळे मिटून गुडघ्यांवर तळवे ठेवा.
– आता दीर्घ श्वास घेऊन वेगाने श्वास बाहेर सोडा.
– पुढे लयबद्ध श्वासोच्छ्वास करायची ही प्रक्रिया नियमित अभ्यासाने १५ ते २० मिनिटापर्यंत सुरू ठेवता आली तर ॲसिडिटीची समस्या कमी होईल.
– तसेच कपालभाती प्राणायामामुळे पचनाचे विकार पोटाची चरबी आणि पोटाशी संबंधित इतर काही विकारांच्या समस्या असतील तर त्या दूर होतात.
२) पश्चिमोत्तानासन – हे योगासन करण्यासाठी,
– योगा मॅट वर बसून पाय सरळ रेषेत ठेवा.
– आता सुरुवातीला हात बाजूला ठेवा.
– यानंतर पाठीचा कणा ताठ असल्याची खात्री करून हात समोर घ्या.
– यासोबत पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
– सुरूवातीला काही सेकंद या आसनाचा नियमित अभ्यास केल्यावर १ ते ३ मिनिटापर्यंत या स्थितीत राहण्याची सवय लावून घ्या.
– पुढे सावकाश मूळ स्थितीकडे परत या आणि रिलॅक्स व्हा.
– ओटीपोटासाठी उत्तम असणारं हे आसन पचन समस्यांना दूर करतं पोटातली चरबी कमी करायला मदत करतं.
३) मार्जारासन – हे योगासन करण्यासाठी,
– आपले दोन्ही हात आणि गुडघे जमिनीवर टेकवून मांजराप्रमाणे शरीर स्थित ठेवा.
– पुढे श्वास घेताना हनुवटी वर उचलून पाठीची कमान करा.
– यानंतर काही मिनिटांनी पाठ पूर्ववत करा.
– आता ही क्रिया ३ ते ५ वेळा करा.
– मार्जारासनमुळे रक्ताचा प्रवाह सुधारतो. पचन करणाऱ्या अवयवांचा मसाज होतो आणि मणक्यावरचा ताणही दूर होतो. यामुळे शरीराला आराम मिळतो.