| | |

दही पोहे म्हणजे अव्वल दर्जाचा हेल्दी नाश्ता; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। रात्रभर झोपेत आपण किमान ८ तास तरी उपाशी असतो. त्यामुळे सकाळचा नाश्ता कसा पोटभर आणि ऊर्जा देणारा असायला हवा. पण असा हेल्दी नाश्ता म्हणजे नक्की काय हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर रोज सकाळी येऊन उभा राहतो. कसं आहे, सकाळी नाश्ता पौष्टिक हवा म्हणजे तो तेलकट नको, तिखट नको मग कसा हवा? हे अनेकदा आपल्याला काळात नाही. तर मित्रांनो नाश्ता असा हवा ज्याच्या सेवानानंतर आपल्याला दिवसभर त्रास होणार नाही. त्यात कामावर जाणाऱ्या प्रत्येकाला सकाळी इतकी घाई असते कि नाश्ता बनवायला आणि करायला त्यांना वेळ कमी पडतो. मग अश्या लोकांसाठी सोप्पा आणि पौष्टिक उपाय आम्ही घेऊन आलो आहोत. जो झटपट बनतो आणि भूकसुद्धा भागवतो. हा नाश्ता म्हणजे दही पोहे.

दही पोहे बऱ्याच ठिकाणी खूप आवडीने खाल्ले जातात. मुख्य म्हणजे, दही पोहे म्हणजे आपला पोह्यांचा चिवडा घालून त्यात दही मिक्स करणे नव्हे. अर्थात तुम्ही तसं करू शकता. पण खरतर दही पोहे बनविण्याची पण एक वेगळीच मजा आहे. यासाठी पोहे धुऊन त्यामध्ये दही आणि गूळ मिसळून खायचा बस इतकेच आहे. अनेक ठिकाणी हा पदार्थ देवासाला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. चला तर आधी जाणून घेऊयात हा पदार्थ कसा बनवायचा आणि यानंतर जाणून घेऊ तो खाण्याचे फायदे:-

० साहित्य – १ वाटी दही, २ चमचे किसलेला गूळ आणि १ १/२ वाटी पोहे

० कृती १ – यासाठी पोहे पाण्यात धुऊन घ्या आणि मऊ करून घ्या. यानंतर त्यात गुळाची पावडर किंवा किसलेला गूळ मिसळा. पुढे या मिश्रणात दही मिसळून त्याचा गोडवा येण्यासाठी थोडा वेळ तसेच ठेवा. यानंतर साधारण १० मिनिटांनी मस्त नाश्ता करण्यासाठी दही पोहे तयार.

० कृती २ – काही जण हा नाश्ता तिखट दही पोहे म्हणून बनवतात आणि आवडीने खातात. यासाठी पोहे भिजवून घ्या. त्यात दही मिसळा आणि चवीनुसार मीठ मिसळून घ्या. यानंतर वरून तेलाची वा तूपाची फोडणी द्या. यासाठी तेल वा तूप तापवून त्यात जिरे, मोहरी, हिंग, हिरवी वा लाल मिरची, कडिपत्ता घालून तडका तयार करा आणि पोह्यात मिसळा. हवी असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा आणि खा.

० फायदे
१) फायबरयुक्त पौष्टिक पदार्थ – दही पोहे यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. कारण पोहे जेव्हा दह्यासह मिसळतात तेव्हा ते अधिक फायदेशीर होतात. आतड्यांना अधिक निरोगी ठेवण्यासाठी हे परफेक्ट डाएट आहे. शिवाय वजन कमी करण्यासाठीसुद्धा आपल्या डाएटमध्ये दही पोहे फायदेशीर ठरतात. याव्यतिरिक्त गूळ आणि दही या दोन्हीत वजन कमी करण्यासाठी उपयुक्त घटक असतात.

२) पचण्यास हलके व सोपे – दही पोहे खाल्ल्यानंतरही पोट हलकेच वाटते कारण हा नाश्ता पचायला हलका आहे. परंतु सकाळी हा नाश्ता केल्यानंतर बऱ्याच तासांपर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. शिवाय दिवसभर चांगली ऊर्जा आणि उत्साह राहतो. हा नाश्ता अधिक चविष्ट बनविण्यासाठी यामध्ये ड्रायफ्रूट्स वा फळांचा वापर करता येईल. यामुळे लहान मुलेही आवडीने हा पदार्थ खातील. यासाठी केळी, चिकू, सफरचंद, द्राक्ष अशा फळांचा समावेश करता येईल.

३) बिघडलेल्या पोटासाठी लाभदायक – पोटात दुखत असेल वा जंत झाले असतील, तर तुम्ही दही पोहे उत्तम नाश्ता आहे. यासाठी गूळ हलका जास्त वापरावा. यामुळे पोह्यांचा त्रास होणार नाही आणि मालविसर्ग होण्यास मदत होईल.

४) कमी कॅलरीमुले वेट कंट्रोल – फायबरसह या नाश्त्यामध्ये कॅलरीची मात्रादेखील कमी असते. त्यामुळे वजन वाढत नाही. तज्ज्ञांनुसार यामध्ये सर्व आवश्यक पोषक तत्व असतात. तसेच केवळ ३०० कॅलरी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

५) भरपूर लोह – शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर दही पोहे जरूर खा. यामुळे एनिमियासारखा आजार होणार नाही. शिवाय यात लोहाचे प्रमाण अधिक असल्यामुळे अगदी गर्भवती महिलासुद्धा हा नाश्ता करू शकतात.

० महत्वाचे – ज्यांना पोह्यांचा त्रास होतो त्यांनी हा नाश्ता टाळावा. याशिवाय जर तुम्हाला दही पोहे खाताना काही समस्या जाणवली तर खाणे थांबवा.