| | |

नारळपाणी पिण्याचे ‘हे’ फायदे वाचाल तर थक्क व्हाल !!!

हॅलो आरोग्य ऑनलाईन । ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’. अशी एक म्हण आपल्याकडे दैवी चमत्कारासाठी वापरली जाते. त्याचप्रमाणे नारळपाणी हा निसर्गाचा एक विलक्षण असा चमत्कार आहे. कठीण कवच असलेल्या शहाळ्यात दडलेल्या मधुर आणि थंड पाण्यात तहान भागवण्याची क्षमता आहे. नारळपाण्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म दडलेले आहेत. ज्यामुळे नारळपाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आजारी रूग्ण, वृद्ध माणसे आणि गरोदर महिलांना नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण नारळाच्या पाण्यात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता असते. तज्ञांच्या मते नारळपाणी पिण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळची वेळ उत्तम आहे. कारण या काळात शरीराला जास्त उर्जेची गरज असते. व्यायाम अथवा शारीरिक कसरत केल्यावर नारळपाणी पिण्याने तुम्हाला फ्रेश वाटू शकते. नारळपाण्यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि उत्साही दिसता. यासाठीच नारळपाणी पिण्याचे फायदे काय आहेत ते आज आपण जाणून घेऊयात. (Coconut Water Benefits In Marathi)

नारळपाण्यामधील पोषक घटक (Coconut Water Nutrition Facts)

नारळाची झाडं समुद्रकिनाऱ्यासहित जास्त पावसाच्या प्रदेशात वाढतात. शहाळ्यामध्ये नैसर्गिक पाणी असतं. जसं जसं शहाळ्याचं नारळात रूपांतर होतं तस तसं त्यातील पाण्याच्या भागाचं खोबरं तयार होतं. नारळाच्या दुधातही अर्ध्या प्रमाणात नारळाचे पाणी आणि अर्ध्या प्रमाणात खोबऱ्यातील फॅट्स असतात. एक नारळ तयार व्हायला एक वर्ष लागत असेल तर त्याचे शहाळे सात ते आठ महिन्यात तयार होतं. या शहाळ्यात असणाऱ्या गोड, मनाला तृप्त करणाऱ्या पाण्यात अनेक पोषक घटक असतात.

एक कप नारळपाण्यातील पोषक घटक

  1. फॅट्स ०
  2. कॅलरिज ४६
  3. फायबर्स ३ ग्रॅम
  4. कार्ब्स ९ ग्रॅम
  5. प्रोटिन्स २ ग्रॅम
  6. व्हिटॅमिन सी १० टक्के
  7. मॅग्नेशिअम १५ टक्के
  8. मॅगनीज १७ टक्के
  9. पोटॅशिअम १७ टक्के
  10. सोडिअम ११ टक्के
  11. कॅल्शिअम ६ टक्के

नारळ पाणी पिण्याचे फायदे (Health Benefits)

नियमित एक ग्लास अथवा एक शहाळं नारळपाणी पिण्याचे आरोग्यावर अतिशय चांगले परिणाम होतात. नारळाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट्स असतात. ज्यामुळे ते आरोग्यासाठी एक चांगले पेय ठरते. जे माणसं सतत शारीरिक कामे करतात  अथवा खेळाडूंनी नारळपाणी स्पोर्ट्स ड्रिंक म्हणून पिण्यास काहीच हरकत नाही. नारळपाण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहते. शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास ते मदत करते. शिवाय नारळपाण्यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यामुळे तुमच्या शरीराला चांगला फायदाच होतो. शरीराला त्वरीत ऊर्जा मिळण्यासाठी आणि थकवा घालवण्यासाठी हे नैसर्गिक पेय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

कॅलरिज कमी असतात (Low in calories)

एक कप नारळपाण्यामधून तुमच्या शरीराला ४५ ते ४६ कॅलरिज मिळतात. त्यामुळे सोडा अथवा फळांच्या  रसासारख्या इतर कॅलरिजयुक्त पेयांपेक्षा नारळपाणी पिणे नक्कीच फायद्याचे ठरते. नारळपाण्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही कमी असते. शिवाय कार्बोहायड्रेट कमी असल्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही नारळपाणी प्यायला तरी तुमच्या शरीरात जास्त कॅलरिज वाढत नाही.

मूतखड्यापासून बचाव होतो (Prevent Kidney Stones)

किडनी स्टोन अथवा मूतखडा असणाऱ्या लोकांनी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. साधं पाणी पिणं हे नेहमीच आरोग्यासाठी आणि  मूतखड्यावर उपचार करण्यासाठी उत्तम. मात्र जर तुम्हाला पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही त्याऐवजी नारळपाणी नक्कीच पिऊ शकता. किडनीस्टोन अथवा मूतखडा हा अन्नकणांमधील सोडिअम आणि इतर घटकांपासून तयार होत असतो. या पदार्थांमुळे युरिनमध्ये क्रिस्टलसारखे कण जमा होतात आणि त्यापासून मूतखडा तयार होतो. मात्र नारळपाण्यामुळे हे कण मूत्रमार्गात निर्माण होणे रोखता येते. शिवाय नारळपाण्यामुळे तयार झालेला मूतखडा विरघळण्यासही मदत होते.

मधुमेह नियंत्रित राहतो (Benefits Against Diabetes)

मधुमेहींनी नारळपाणी पिऊ नये असं काही जण सांगतात. मात्र काही संशोधनानुसार नारळपाण्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात नैसर्गिक साखर असते. ज्यामुळे नारळपाणी पिणे मधुमेहींच्या आरोग्यासाठी  उत्तम ठरू शकते. काही संशोधनात तर असं आढळून आलं आहे की नारळपाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. मात्र असं असलं तरी मधुमेहींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्लानुसारच योग्य ते ठरवावे.

ह्रदयाचे कार्य सुधारते (Support Heart Health)

नारळपाणी पिण्यामुळे ह्रदयाचे विकार होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. कारण काही संशोधनानुसार नारळपाणी पिण्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाले असं आढळून आलेलं आहे. त्यामुळे ज्यांना कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या आहे अथवा ह्रदयाच्या आरोग्याबाबत चिंता वाटत आहे त्यांनी नियमित नारळपाणी पिण्यास काहीच हरकत नाही. कारण कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाले तर तुमच्या ह्रदयाचे कार्य नक्कीच सुधारू शकते.

रक्तदाब कमी होतो (Reduce Blood Pressure)

नारळपाण्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. एका संशोधनानुसार ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या होती त्यांच्यावर नारळपाण्याचा उपचार केल्यामुळे चांगला परिणाम झालेला दिसून आलेला आहे. शिवाय नारळपाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असते. ज्यामुळे तुमच्या रक्तादाबावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. यासाठीच नियमित नारळपाणी पिण्याने तुमचा रक्तदाब कमी होऊ शकतो.

अती व्यायामानंतर फायदेशीर (Beneficial After Prolonged Exercise)

व्यायाम अथवा अती प्रमाणात शारीरिक हालचाल केल्यावर त्वरित शक्ती अथवा ऊर्जा मिळण्यासाठी नारळपाणी प्यावे. व्यायाम आणि मेहनतीमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट कमी होतात ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होते. मात्र नारळपाण्यामध्ये भरपूर इलेक्ट्रोलाईट आणि मिनरल्स असल्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा लगेच मिळते. नारळपाण्यात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, सोडिअम आणि कॅल्शिअमही असतात. याचा चांगला फायदा तुम्हाला व्यायामानंतर टवटवीत वाटण्यासाठी करता  येऊ शकतो.

हायड्रेशन कमी  करण्यासाठी उत्तम (Delicious Source of Hydration)

नारळपाणी हे नैसर्गिक गोड आणि मधुर चवीचे असते. शिवाय त्यामध्ये कॅलरिज, कार्ब्स आणि फॅट खूपच कमी  असतात. शहाळ्यातील पाणी थेट पिण्यामुळे तुम्हाला  पटकन फ्रेश आणि उत्साही वाटते. त्यामुळे जेव्हा  तुम्हाला उन्हातून प्रवास करायचा असेल अथवा अती मेहनतीचे काम करायचे असेल तेव्हा शरीर डिहायड्रेट होऊ नये यासाठी नारळपाणी पिणे तुमच्या सोयीचे आणि फायद्याचे ठरू शकते.

पचनशक्ती सुधारण्यास मदत होते (May support good digestion)

शरीराला त्याच्या अंर्तगत क्रिया योग्य पद्धतीने करण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज  असते. खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन करण्यासाठीही शरीराला पाण्याची गरज असते. नारळपाण्यामध्ये पोटॅशिअम आणि इतर अनेक मिनरल्स असतात. नारळपाणी थंड असल्यामुळे शरीरात अपचन, पित्तामुळे होणारी जळजळ कमी होते. नारळपाण्यामुळे तुमच्या शरीराची पचनशक्ती सुधारते. यासाठी ज्या लोकांना पचनाच्या समस्या असतात त्यांनी दिवसभरात एक ग्लास नारळपाणी पिल्यास चांगला फायदा होऊ शकतो.

त्वचेसाठी फायदेशीर (May promote healthy skin)

शरीराला पुरेसे पाणी मिळाले नाही तर डिहायड्रेश होते. याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर होतो. डिहाड्रेशनमुळे तुमची त्वचा  कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. मात्र जर तुम्ही नियमित नारळपाणी पित असाल तर तुमच्या त्वचेचं योग्य पोषण होतं. त्वचेला व्हिटॅमिन सी आणि अॅंटि ऑक्सिडंट मिळतात. ज्यामुळे त्वचा टवटवीत आणि चमकदार होते. नारळपाण्याने त्वचा धुवा आणि पाहा त्वचेवर होणारा परिणाम.

केस मजबूत होतात (Healthy for Hair)

त्वचेप्रमाणेच केसांवरही नारळपाणी पिण्याचे फायदे होतात. नारळपाण्यातील  पोषक घटकांमुळे तुमचे केस मजबूत आणि  चमकदार होतात. केसांच्या मुळांना चालना मिळाल्यामुळे केसांची वाढ होते आणि केस गळणे थांबते. केसांमध्ये पुरेसा मऊपणा आणि ओलावा येतो. केसांना पोषण मिळाल्यामुळे केसात कोंडा होण्याची समस्या कमी होते. केसांना फाटे फुटणे कमी होते आणि केस सिल्की दिसतात.

प्रतिकार शक्ती वाढते (Boosts Your Immunity)

नारळपाण्यात पुरेसे पोषक घटक आणि व्हिटॅमिन्स असतात. याचा  परिणाम तुमच्या प्रतिकार शक्तीवर होतो. नारळपाण्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते आणि आजारपणातून लवकर बरे होण्याचे बळ मिळते. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी नारळपाणी उपयोगी ठरते. यासाठीच आजारी व्यक्तीला नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ताप अथवा वातावरणातील बदलांमुळे होणारे इनफेक्शन टाळण्यासाठी नारळपाणी पिणे फायद्याचे ठरू शकते.