| |

तुमचं मल्टिटास्किंग टॅलेंट तुमच्याच आरोग्याचं करतंय नुकसान; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्याची धावपळीची जीवनशैली पाहता वेळ कमी काम अमाप अशी काहीशी अवस्था प्रत्येकाचीच झालेली आहे. परिणामी प्रत्येकाला एखाद्या रोबोटसारखं स्मार्ट मल्टिटास्किंग वर्क करावे लागत आहे. अर्थातच स्मार्ट म्हणजे हुशार आणि मल्टिटास्किंग म्हणजे अनेक कामे एकाच वेळी करणे. पण खरं सांगायचं तर, तुम्हाला कार्यक्षम बनायचं असेल तर एकावेळी सगळी कामं समोर घेऊन बसू नका. पण, एकावेळी एकच काम एकाग्रतेने करणे जणू आजकालच्या युथसाठी आऊटडेटेड झालंय. त्यामुळे एकावेळी बरीच कामं भराभर आवरून आपल्या बॉसला, नातेवाईकांना आणि मित्र मैत्रिणींना इम्प्रेस करण्यासाठी यांची धडपड सुरु असते. पण मित्रांनो, याऐवजी एकावेळी एकच काम करणे जास्त योग्य आहे. कारण अनेक कामे एकत्र करताना एकतर कामाचा गुंता वाढतो नाहीतर मानसिक ताण. शिवाय मेंदूची आकलन क्षमता लोप पावते आणि परिणामी आपल्या आरोग्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

० मल्टिटास्किंग करण्याचे दुष्परिणाम:-

१) मेंदूच्या कार्यक्षमतेत घट – समजा भाजी चिरताना दुसरीकडे कपड्यांचं मशीन चालू आणि तिसरीकडे अंघोळीच्या पाण्याचा गिझर चालू असेल त्यात तुम्ही फोनवर बोलत असालं तर..? अश्यावेळी कोणताही अपघात वा दुर्घटना घडण्याची शक्यता असते. एकंदरच याची कल्पनाच भयंकर आहे. याचे कारण म्हणजे, आपण एकापेक्षा जास्त गोष्टींवर एकावेळी लक्ष केंद्रित करण्यामूळे मेंदूच्या कामाला मर्यादा पडतात. परिणामी कामाची क्वॉलिटी बिघडते. शिवाय आपण आपले कौशल्य दाखवण्यात असमर्थ ठरल्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ लागतो. म्हणून एकावेळी एकाच कामाकडे एकाग्रतेने लक्ष द्या आणि पूर्ण करा.

२) कामाची गती मंदावते – एकावेळी जास्त कामे करण्यामुळे वेळ वाचतो असे म्हटले जाते. पण खरंतर यामुळे ती सर्व कामे एकत्र करताना आपल्याला जास्त वेळ लागतो. आता सोप्प सांगायचं झालं तर उदा. ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलत असाल तर ड्रायव्हिंग स्पीड कमी होणारच ना? परिणामी तुम्हाला जिथे पोहचायचे आहे तिथे जायला उशीर होईल. मित्रांनो प्रत्येक कामाला वेगवेगळ्या मानसिकतेची आणि पुरक वेळेची गरज असते. त्यामुळे कामांची सरमिसळ करु नका.

३) अपघाताचे कारण – आपण अनेकदा खूप व्यस्त असल्यामुळे अनेक अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो ज्या गोष्टी लहान असल्या तरीही महत्वाच्या असतात. जसे कि तुम्ही चालताना फोनवर बोलत असाल तर तुमचा आपसूकच रस्त्यातील खड्डे, दगड आणि गाड्यांकडं दुर्लक्ष होते. परिणामी अपघात होऊ शकतो.

४) विस्मृतीत भर – मल्टीटास्कींग करत असताना डोळ्यासमोर घडणारी आणि कानावर पडणारी प्रत्येक गोष्ट मेंदूपर्यंत पोचत असेलच याची खात्री देणे अशक्य आहे. यामुळे अनेकदा कानावरून गेलेली गोष्ट लक्षात न राहिल्यामुळे व्याप वाढू शकतो.

५) नात्यांमध्ये दुरावा – अनेक कामांमध्ये व्यस्त असणारे आपण अनेकदा कुटुंबापेक्षा कामाला प्राधान्य देतो आणि यामुळे कुटुंबातील व्यक्ती जसे कि, आई, बाबा, पती वा पत्नी, आपली मुले उत्साहाने जवळ आल्यास त्यांना झिडकारतो. परिणामी ती व्यक्ती नाराज होते. तसेच आपल्या कामाच्या व्यापात आपण घरातील जेष्ठ व्यक्तींच्या तब्येतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतो आणि यामुळे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. शिवाय सोशल मिडीयाच्या अतिरेकामुळे पती पत्नी मधला संवाद कमी आणि चिडचिड जास्त होते.

६) आजारांना आमंत्रण – कामांमुळे माणूस अगदी १० मिनिट शांत बसून सुखाचे दोन घास जेवणेसुद्धा विसरला आहे. जेवताना एकतर कॉम्प्युटर/ लॅपटॉप हाताळणं वा टी.व्ही पहाणं हे रोजच झालं आहे. यामुळे जेवणातलं लक्ष उडतं आणि आपण काय व किती खाल्लं याचं भान उरत नाही. परिणामी वजन वाढणं, मधुमेह असे आजार लागतात.

७) सर्जनशीलतेचं नुकसान – एखादं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं “अरे! यापेक्षा वेगळं आणखी चांगलं हे काम झालं असतं!” तर हा आहे आणखी एक तोटा. फक्त काम पुर्ण करण्यामध्येच आपण एव्हडे गुंतुन जातो कि त्यातले चांगले पर्याय निवडायचे राहूनच जातात. जसे कि, बिर्याणी बनवताना त्यात मसाले घालायचे राहून गेले तर? अशी बिर्याणी तुम्हाला तरी आवडेल का? तर हेसुद्धा असेच आहे. मल्टीटास्कींगमध्ये बिर्याणी तर तयार होते मात्र स्वाद फिका पडून जातो.

८) मानसिक तणाव – खूप काम एकत्र करण्याच्या नादात आपण प्रत्येक कामात एकतरी चूक करून ठेवतोच. हि चूक आपल्याला दिसत नाही. पण समोरच्याला दिसते आणि त्याने ती दाखवली कि आपली नाहक चिडचिड होते. परिणामी आपण कामाचा ताण घेऊ लागतो आणि मानसिक तणावात वाढ होते.