|

केस पांढरे होण्यामागे आपल्याच चुका कारणीभूत; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले सौंदर्य म्हणजे केवळ त्वचा सुंदर दिसणे नव्हे, तर त्वचेसोबत केसांचेही आरोग्य सुदृढ असणे म्हणजे सौंदर्य होय. अनेकदा आपण मेकअपचा वापर करून चेहरा तर सुंदर आणि रेखीव भासवु शकतो मात्र केसाचे काय. जर केस व्यवस्थित असतील तर चांगली केशरचना अर्थात हेअर मेकअप करता येतो. यामुळे संपूर्ण लुक बदलतो. परंतु, बऱ्याचदा केसांची काळजी न घेतल्यामुळे केस कोरडे, शुष्क आणि निर्जीव होतात. इतकेच नव्हे तर आपले केस अकाली पांढरेदेखील होऊ लागतात. एकदा का पांढऱ्या केसांची प्रक्रिया सुरू झाली की, त्यावर नियंत्रण ठेवणे अतिशय अवघड असते. चला तर, जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्यांमुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात. हा लेख पूर्ण वाचा कारण या चुका सुधारून तुम्ही तुमचे केस पांढरे होणे थांबवू शकता.

१) नियमित तेल न लावणे
– लहानपणी आई आपल्या केसांना अगदी चापून चुपून तेल लावायची आणि व्यवस्थित केस विंचरून द्यायची. पण आता मोठे झाल्यानंतर स्टाईलच्या नादात आपण केसांना तेल लावणे जणू विसरूनच गेलो आहोत. मुळात, तेल केसांना पोषण देते आणि डोक्यातील रक्त परिसंचरण सुधारते. याशिवाय तेल मालिश त्वचेतील सेबम उत्पादन नियंत्रित करते. यामुळे केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो. शिवाय यामुळे केस अकाली पांढरे होणे कमी होते. तसेच केस कोरडे होणे , स्काल्पमध्ये खाज येणे यासारख्या समस्याही दूर होतात.

२) केस न धुणे आणि दररोज केस न विंचरणे.
– दिवसभरातील दगदग आणि पळापळीमूळे केसांमध्ये घाम येतो. शिवाय धूळ, माती आणि प्रदूषणामुळे केसाचे सौंदर्य जणू गायबच होऊन जाते. दरम्यान केस धुतल्याने आणि दररोज विंचरले असता केसांमधील धूळ आणि वाऱ्यामुळे झालेली जटादेखील निघते आणि स्काल्प स्वच्छ राहतो. परिणामी केस स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत मिळते.

३) रसायनांचा वापर
– केस सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी लोक रसायनांद्वारे आणि मशीनच्या साहाय्याने सरळ केस कुरळ आणि कुरळ केस सरळ करतात. याशिवाय केस कलर करणे तर एक फॅशन आहे. अशा स्थितीत लहान वयात केसांमध्ये तीव्र रसायनांचा वापर केल्याने केसांचे प्रचंड नुकसान होते. परिणामी केस गळती, केसांचा कोरडेपणा आणि अकाली पांढरे केस या समस्यांना चालना मिळतेत्यामुळे केस शक्य तितके नैसर्गिक ठेवा आणि हीटिंग टूल्स वापरू नका.

४) ताण तणाव
– मासिक ताण आणि तणाव हे केस अकाली पांढरे होण्याचे मुख्य कारण मानले जाते. त्यामुळे जास्त ताण न घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही दररोज योगाभ्यास, ध्यानधारणा आणि मोकळ्या वातावरणात चालण्याच्या सवयी शरीराला लावून घ्या. तणाव कमी करणे गरजेचे आहे कारण तणावामुळे आपल्याला आरोग्याशी संबंधित इतर समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.

५) अयोग्य आहार घेणे.
– बदलत्या जीवनशैलीत घरच्या अन्नापेक्षा जास्त बाहेरचे जंक फूड आणि रिच फूड खाण्याची सवय शरीराला लागली आहे. ज्यामुळे अनेक रोग आपल्याला गिळंकृत करू पाहत असतात. या सवयी शरीराचे आरोग्य खराब करतेच शिवाय केसांचेची आरोग्य बिघडवते आणि परिणामी केस अकाली पांढरे होतात. मुळात, आपण जे खातो त्याद्वारे आपले शरीर आणि केस पोषित होतात. त्यामुळे डाळी, अंकुरलेली धान्य, फळे, हिरव्या पाले भाज्या इ. आपल्या आहारात असणे आवश्यक आहे.