|

देशावर झिका व्हायरसचे नवे संकट; जाणून घ्या लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गतवर्षापासून संपूर्ण देश कोरोनासारख्या घातक विषाणूशी सामना करीत आहे. यानंतर आता कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय तोच नवनवे व्हेरियंट नागरिकांची चिंता वाढवताना दिसत आहेत.या दरम्यान आता आणखी एका धोकादायक विषाणूची भर पडली आहे. झिका नामक विषाणूची पहिली घटना केरळमध्ये समोर आली आहे. या पहिल्या घटनेत २४ वर्षीय गर्भवती महिलेला डासांमुळे होणारा आजार असल्याचे निदान झाले. त्यांना ताप, डोकेदुखी आणि शरीरावर लाल निशाण आल्यामुळे रुग्णालयात दाखल केले असता या आजाराचे निदान झाले होते. दरम्यान तिरुअनंतपुरममध्येही या विषाणूचे १३ संशयित रुग्ण आढळले आहेत. हा विषाणूदेखील कोरोनासारखाच घातक असल्यामुळे याबाबत आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊयात नेमका झिका व्हायरस काय आहे? तो कुठून आला? त्याची लक्षणे कोणती? आणि मुख्य म्हणजे यावर उपचार आहेत का?

१) झिका व्हायरस म्हणजे काय?
– जागतिक आरोग्य संघटने (WHO – world health organization)च्या अधिकृत वेबसाइटनुसार झिका (Zika) विषाणूचा आजार प्रामुख्याने Aedes डासांद्वारे पसरणाऱ्या विषाणूमुळे होतो. हा डास दिवसा चावतो आणि चावतेवेळी हे विषाणू आपल्या शरीरात सोडतो.

२) हा विषाणू प्रथम कोठे सापडला?
– झिका विषाणू हा डासांद्वारे संक्रमित फ्लॅव्हिव्हायरस आहे. जो सर्वप्रथम १९४७ सालामध्ये युगांडाच्या माकडांमध्ये सापडला. यानंतर १९५२ सालामध्ये युगांडा आणि टांझानियामधील मानवांमध्येदेखील त्याची काही लक्षणे दिसून झाली. पुढे बघता बघता झिका व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव आफ्रिका, अमेरिका, आशिया आणि पॅसिफिकमध्येदेखील पसरला आहे.

३) झिका व्हायरसची लक्षणे कोणती?
– झिकाची लक्षणे डेंग्यू आजारासारखीच असतात आणि सामान्यत: सौम्यही असतात. यामध्ये
* ताप
* पुरळ
* नेत्रश्लेष्मलाशोथ
* स्नायू आणि सांधेदुखी
* अस्वस्थता किंवा डोकेदुखीचा समावेश आहे.
हि लक्षणे सहसा २ ते ७ दिवस सलग असतात. झिका विषाणूच्या संसर्गात बहुतेक लोकांमध्ये कोणतीच लक्षणे विकसित होत नाहीत. मात्र वयस्कर आणि मुलांमध्ये झिका विषाणूच्या संसर्गामुळे न्यूरोलॉजिकल जोखीम वाढविण्याचा धोका फार मोठा आहे.

४) उपचार
– झिका व्हायरसवर कोणतेही विशिष्ट उपचार किंवा लस अद्याप उपलब्ध नाही. मात्र झिका लसीवर तज्ज्ञांकडून अभ्यासपूर्वक संशोधन सुरु आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य एजन्सीद्वारे झिकाशी संबंधित कोणतीही लक्षणे असल्यास त्या लोकांनी
* भरपूर विश्रांती घेणे
* द्रव पदार्थांचे सेवन करणे
* सामान्य औषधाने वेदना आणि तापावर उपचार करण्याचा सल्ला दिला आहे.
* WHO च्या सांगण्याप्रमाणे, झिका विषाणूचा संसर्ग केवळ डास चावण्यापासून टाळता येतो. यामुळे गर्भवती महिला, प्रजनन वयोगटातील महिला आणि लहान मुले यांचे डासांपासून संरक्षण कसे होईल याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.